गेली सुमारे दोन वर्षे भाजपच्या दारात ताटकळत बसलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास अजून मुहूर्त मिळत नसला तरी, त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार नितेश यांना विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह देण्याच्या निर्णयामुळे राणे कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. या नव्या घरोब्याचा त्यांना फायदा उठवता येईल, पण फारशी राजकीय ताकद न उरलेले राणे भाजपसाठी किती लाभदायी ठरतील, हा प्रश्नच आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राणे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा मुंबईत प्रारंभ केला. १९९०च्या दशकात ते कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आले आणि उत्तम प्रकारे बस्तान बसवलं. याचबरोबर मुंबईतील संपर्काचा फायदा उठवत आपण केवळ सिंधुदुर्ग नव्हे, तर रत्नागिरीसह कोकणचे नेते असल्याचा आभास यशस्वीपणे निर्माण केला आणि आजतागायत टिकवला. २००५ मध्ये कॉंग्रेसवासी झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा सहकारी बँक ताब्यात ठेवण्यात राणे आजपर्यंत यशस्वी असले तरी जिल्ह्य़ाचे नियंत्रण सुटू लागले आणि रत्नागिरी जिल्ह्य़ात तर त्यांचा कधीच फारसा प्रभाव पडला नाही. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत थोरले चिरंजीव नीलेश आणि विधानसभा निवडणुकीत दस्तुरखुद्द राणेंचा पराभव झाल्यानंतर तर त्यांचं प्रभाव क्षेत्र सिंधुदुर्गातील देवगड-कणकवली, कुडाळ-मालवणपर्यंत आक्रसलं आहे. जिल्हा पातळीवरचं ‘साम्राज्य’ लयाला जात असताना राणे आणि त्याहीपेक्षा नीलेश आणि नितेश या दोघांच्या वागण्या-बोलण्याच्या शैलीमुळे राजन तेली, परशुराम उपरकर, काका कुडाळकर, संजय पडते आणि अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी सतीश सावंत यांच्यासारखी राणेंचं हे साम्राज्य सांभाळणारी माणसं दुरावत गेली आहेत. आता त्यांची सारी धडपड आपल्या दोन मुलांचं राजकीय बस्तान बसवण्यासाठी आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी कणकवलीत पाच तास वाट बघत बसण्याच्या मानहानीचं हलाहल त्यांनी पचवलं, एवढंच नव्हे तर, काही कसूर राहू नये म्हणून पुन्हा नीलेश यांना रत्नागिरीत स्वागतासाठी पाठवलं.
आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी राणे कितीही उतावीळ असले तरी मुख्यमंत्री फडणवीस अजूनही त्याबाबत सावध भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. मंगळवारी रात्री उशिरा फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेतही, फक्त नितेश यांना भाजपतर्फे एबी फॉर्म देण्याचं ठरलं. राणे आणि नितेश हे दोघेही भाजपच्या ‘कोटय़ा’मध्ये सहभागी झाले आहेत. पण त्या बदल्यात राणे कोकण ‘भाजपमय’ करू शकण्याची शक्यता फार कमी आहे.